शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

तीर्थरूप अण्णा व सौ.वहिनी


              सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य कारकुनाच्या घरातील ही घटना .पायगोंडा पाटलांच्या घरी पाहुणे आले होते.जेवणाची पंगत बसली होती.जेवता जेवता पाहुण्यांनी पायगोंडांना विचारले,"तुमचे चिरंजीव काय करतात ? "पायागोंडा पाटलांनी उत्तर दिले,"काही नाही,भाऊ दोन वेळचं खातो आणि गावभर हिंडतो दुसरं काय."त्या तरुण मुलाची पत्नी आपल्या नवऱ्याला पानात वाढत असतानाचं हे वाक्य त्या तिच्या काळजाला भिडले.पुढे गोरगरिबांच्या कित्येक लेकरांची आई बनणाऱ्या त्या तरुण मुलीचे डोळे अश्रुंनी डबडबले व पतीच्या ताटात पडले.महाराष्ट्राचा शैक्षणिक चेहरामोहरा बदलण्यास ही घटना कारणीभूत ठरावी असा विचारदेखील कोणाच्या मनाला शिवला नसेल.
                त्याचवेळेस तो तरुण मुलगा ताडकन घराबाहेर पडला व १० - १२ कोसांचे अंतर पायी तुडवत सातारा येथे पोहचला.रोजीरोटीचे साधन म्हणून चार-दोन मुलांना घेऊन त्यांच्या शिकवण्या घेऊ लागला.हाच तरुण मुलगा अल्पावधीत पाटीलमास्तर म्हणून नावारूपास आला.
              शिक्षणाची आस त्याला स्वस्थ बसू देईना.बहुजनांच्या मुलांना शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्या पोटाची खळगी भरली पाहिजे व एकत्र राहून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे हे जाणूनच त्याने वसतिगृह सुरु केले व पुढे १९१९ साली कराडमधील काले या गावी रयत शिक्षण संस्थेचे बीज रोविले जी गेली शतकभर वटवृक्षासारखी फोफावली असून ६७५ शाखांच्या माध्यमातून बहुजनांच्या मुलांना परवडणारे शिक्षण देत आहे.इंग्रजी ही जर वाघिणीचे दुध असेल तर ही वाघीणच बहुजनांच्या झोपडीशी आणून बांधणारा हा अवलिया तरुण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच आम्हा रयतसेवकांचे तीर्थरूप अण्णा.
             रयत शिक्षण संस्था ज्या माऊलीच्या त्यागातून उभी राहिली ती माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची धर्मपत्नी सौ.लक्ष्मीबाई पाटील .भाऊरावांनी अठरापगड जातीच्या मुलांना एकत्र करून शिक्षण कार्यास सुरुवात केली .त्या मुलांना जेवण करून खाऊ घालण्याचे व आईप्रमाणे त्यांचे सारे काही करण्याचे सौ.वहिनींनी केले.जैन धर्मातील कडक सोवळ्याचे पाश सैल झाले आणि वहिनी वसतिगृहातील साऱ्या मुलांच्या  आई झाल्या.
               अण्णा संस्थेसाठी देणगी गोळा करण्यासाठी परगावी गेले असताना वहिनींनी वसतिगृहातील मुलांची आबाळ होऊ दिली नाही.माहेरातून १२० तोळे सोन्याने मढवलेली हि लक्ष्मी वसतिगृहातील मुलांच्या पोटासाठी आपले सौभाग्यलंकार मंगळसूत्रही गहाण ठेवण्यास मागे सरली नाही.इतकेच काय मृत्युशय्येवर समोर प्रत्यक्ष मृत्यू दिसत असतानाहीमृत्युच्या  दुसऱ्या दिवशी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी वसतिगृहातील मुलाना गोडधोड खाऊ घालण्याची व आणि  त्या  आजारात स्वतःचे  काही बरे वाईट झाल्यास वसतिगृहातील विविध जातीच्या मुलांनी आपल्या प्रेतायात्रेस खांदा लावण्याची अपेक्षा व्यक्त करणारी ही थोर माऊली म्हणजे अण्णांनी सुरु केलेल्या या ज्ञानयज्ञातील एक समिधाच.
           'कमवा आणि शिका 'यासारखी योजना सुरु करून कर्मवीर अण्णांनी गोरगरिबांच्या मुलांना उत्तुंग स्वप्ने पाहण्याची संधी दिली.स्वावलंबनातून शिक्षणाची कास धरताना अण्णांनी हाताला घट्टा असणाऱ्या विद्यार्थ्याची अपेक्षा व्यक्त केली.आजदेखील संस्थेच्या देवापूर,रुकडी यासारख्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहाय्याने शेती केली जाते.
         आजच्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था  व तिचे फलित पाहिले तर कर्मवीरांची आठवण पदोपदी आल्याशिवाय राहत नाही. आज शिक्षणाला व्यावसायिक रूप आलेले दिसते.अनेक शिक्षण सम्राट प्रत्येक शहरात निर्माण होत आहेत.आजचा विद्यार्थीही बदलताना दिसत आहे.शिक्षण मातीशी फारकत घेताना दिसत आहेत.माउसवर फिरणारी बोटे इथल्या मातीपासून दूर चालली आहेत.मात्र आजदेखील अण्णांची 'रयत' आपला वसा जपत आहे.शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी वाड्या वस्त्यांमधील लेकरांना प्रगतीची नवी क्षितिजे निर्माण करत आहे.एकीकडे कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेला बळीराजा आत्महत्या करत आहे तर दुसरीकडे शासनाने अनुदान बंद करूनही संस्थेचे सेवक व विद्यार्थी या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाहू बोर्डिंगच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्या पंखाना बळ देत आहे.
       आज अण्णा आपल्यात जरी नसले तरी राजकारणापासून समाजकारणापर्यंत ,विज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रात अण्णांच्या रयतचे विद्यार्थी आपला ठसा उमटवीत आहेत.'रयत'च्या माध्यमातून प्रगत महाराष्ट्राची शैक्षणिक पायाभरणी करणाऱ्या तीर्थरूप अण्णा व सौ.वहिनींना विनम्र अभिवादन !

   

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

स्वागतम् ! स्वागतम् !

       ब्लॉगच्या या अनोख्या दुनियेत नव्यानेच प्रवेश करणाऱ्या माझ्यासारख्या नवशिक्याचे आपण सारे सुज्ञ व तंत्र
स्नेही स्वागत कराल अशी अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो.
        शिक्षण क्षेत्रात नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत आहेत.विद्यार्थ्यांतील गुण शोधण्याच्या दृष्टीने माझे अनेक शिक्षक बांधव झटत आहेत.खडू फळा पुस्तक यांच्या कक्षा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत.शिक्षण क्षेत्र आता कात टाकू लागला आहे.फळ्यासमोर बसून शिक्षकांचे बोलणे ऐकणारा विद्यार्थी आता वर्गाबाहेर पडू लागला आहे.अध्ययन  घटक व शिक्षक केंद्रित असलेल्या पुस्तकांची जागा आता विद्यार्थी केंद्रित पुस्तकांनी घेतली आहे.कृतीतून शिक्षण ही संकल्पना शाळाशाळांमध्ये आनंदमयी शिक्षण घेवून आली आहे.संचित ज्ञान अभ्यासणे मागे पडून आता ज्ञानरचनावाद ही नवीन संकल्पना रुजू लागली आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या अनुभवातून विद्यार्थी ज्ञानाची रचना करू लागलेत.शिक्षण तंत्र स्नेही बनले आहेत.
         शिक्षण क्षेत्रातील या नवनवीन प्रयोगात एक शिक्षक म्हणून माझ्या शाळेत करत असलेल्या काही नव प्रयोग आपल्यासमोर मांडून त्यातून अधिक प्रेरणा व मार्गदर्शन मिळविण्यासाठी हा लेखन प्रपंच.